Photo Bulletin – September 2024
Photo Bulletin – September 2024

Photo Bulletin – September 2024

संकलन आणि संपादन – निकिता देवासे

सोनखांब – शाळा स्वच्छता आणि सुशोभीकरणात समुदायाचा पुढाकार

– प्रीतम नेहारे

गेल्या तीन आठवड्यापासून मी सोनखांब बेड्यावर मुलांना शिकविण्याचे काम करीत आहे. मला इथे प्रत्येक दिवशी नवीन अनुभव जगायला मिळतो. या समुदायामधील एक गोष्ट खूप छान दिसते ती म्हणजे शाळेला असलेला समुदायाचा सपोर्ट.

माझा बेड्यावरील शाळेचा प्रवास खूप छान चालू आहे. एका दिवशीची गोष्ट. शाळेत मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे तसे ग्राउंड नाही. शाळेच्या परिसरात गवत खूप वाढलेले आहे. तर ग्राउंड बनविण्यासाठी मुले आणि मी शाळेच्या परिसरातील गवत काढायचे ठरवले. पण पावसाचे दिवस असल्यामुळे गवत सहजपणे निघण्यासारखे नव्हते. तरीही आम्ही परिसरातील गवत काढण्यास सुरुवात केली. आम्हाला गवत काढताना पाहून समुदायातील काही लोक तिथे आले आणि म्हणाले “हम भी करे कुछ मदत?” हे ऐकून मनाला खूप छान वाटलं. आणि त्यांनी आम्हाला शाळेच्या परिसरातील गवत काढण्यास मदत केली. गवत काढत असताना तिथल्या एका पालकांनी मला म्हटले, “मेरे बेटे को भी आप इधर पढाना.” हे वाक्य माझ्यासाठी खूप भारी होते. आणि गवत काढण्यासाठी समुदायाने दिलेला मदतीचा हात हा माझ्यासाठी खूप सुखद आणि आनंददायी होता. 

शाळेच्या परिसरात गवत खूप वाढलेले होते आणि आमच्याकडे फवारणी पंप नसल्यामुळे गवत कसं काढायचं आणि मुलांसाठी खेळायला ग्राउंड कसे बनवायचे याची काळजी वाटत होती. पण समुदायाच्या सहभागामुळे आज हे काम गतीस आले आहे.

Read more

असोला – जेव्हा मुलेच शिक्षणाची जबाबदारी घेतात

– सुषमा महारवाडे

आमच्या असोला बेड्यावर ‘स्टुडन्ट लीडर’ चा प्रोजेक्ट सुरू आहे. तर मला अशा विद्यार्थ्यांची निवड करायची होती  ज्यांना शिकवण्यात, मुलांसोबत वेळ घालवण्यात आवड असेल.

ही सुहानी, इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी आहे. तिला मुलांना शिकवायला खूप आवडते. तर तिला मी दोन दिवसाआधी सांगितले होते की, तुला पहिल्या वर्गाच्या मुलांना शिकवायचे आहे. मी तिला छोटासा लेसन प्लॅन तयार करून दिला. आणि तिला ते समजावून सांगितले. सुहानीने दोन दिवस त्यावर छान अभ्यास केला. तिने काल मला विचारले, ‘मुझे अब कब पढ़ाना है?’ मला ती मुलांना शिकवण्यासाठी खूप उत्सुक दिसत होती. म्हणून मी लगेच तिला वर्ग घेण्यासाठी वेळ दिला. तिला लेसन प्लॅन मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या त्या तिन्ही ऍक्टिव्हिटीज तिने खूप छान पद्धतीने क्लासमध्ये घेतल्या. आणि शिकवताना तिला खूप मज्जा येत आहे हे मला दिसलं. मुले क्लासमध्ये सहभागी होताना दिसत होते. 

क्लास झाल्यानंतर मी तिला विचारले की तुला क्लास घेताना कसे वाटत होते, तर तिने सांगितले की, तिला खूप मज्जा येत होती.  ती म्हणाली, “मुले माझं ऐकत होती तर मला खूप छान वाटत होते. मला मुलांसोबत मैत्री करायला आवडले.” आणि ती सांगत होती,“मला सेजलने म्हटले की तुमने बहुत अच्छा पढाया।” सुहानी ला शिकवत असताना पाहून तिच्या वर्गातील मुलांना पण पहिल्या वर्गातील मुलांना शिकवण्याची इच्छा निर्माण झाली. यानंतर रिद्धी आणि राधाने पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांचा वर्ग घेतला. आता या मुली लहान मुलांना गृहपाठ देण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी नेहमी उस्तुक असतात.

Read more

चक्रीघाट – जेव्हा समुदायातली पहिली पिढी वाचायला शिकते

– निधी वासनिक

आज मला मुलांमध्ये वाचनाची आवड व वाचनाकडे मुलांची ओढ पाहून खूप आनंद झाला. 

गोविंद भैयाचे मित्र आज बेड्यावर आले होते. गोविंद भैया आणि लाला भैय्या त्यांना मुले कशी शिकत आहे, त्यांचा वाचनाचा प्रवास कसा सुरू आहे याबद्दल सांगत होते. आमची मुलं नागपूरला जातात, शिकतात, रियाज घरला जातात, नवनवीन पद्धतीने वाचन शिकतात इत्यादि. मुलांना शिकण्यासाठी वर्ग खोली नसूनही या संस्थेचे लोक मुलांना खूप छान प्रकारे शिकवतात. आता आमची मुले खूप चांगल्या प्रकारे वाचायला लागली आहे,अशा प्रकारे त्यांची चर्चा सुरू होती. 

तेव्हा गोविंद भैयाचे मित्र म्हणाले की, मुलांना खरंच वाचता येतं का? त्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी गोविंद भैयांनी मुलांना एक एक करून आवाज दिला आणि गोविंद भैयांच्या मित्राने त्यांच्या हातावर स्वतःचे नाव गोंदले होते (शैलेश) ते मुलांना वाचायला लावले. नंतर शैलेश भैय्या म्हणाले, “,एकच शब्द एकमेकांचं वाचलेलं पाहून सांगू शकत असतील.”  त्यांची शंका दूर करण्यासाठी जयेश, वाली, कल्लू, सवा ही मुले वर्गाबाहेर स्टोरी बुक घेऊन आली आणि त्यांना गोष्ट वाचून दाखवायला लागली. शिवाय हेही सांगितले की, ‘हमको पढ़ना आता है’। मुलांचा हा आत्मविश्वास वाढतांना बघून खूप छान वाटते.

Read more

ठणठण –  शाळा बांधण्याचा प्रवास

– पायल गहाणे

बेड्यावर जायच्या पंधरा दिवसाआधीच शाळा बांधण्याविषयी बोलणे सुरू होते. कारण आमचा बेडा यावर्षी लवकर आला होता. आणि त्यांच्या स्वतःच्या झोपड्याही बांधून झाल्या होत्या. एक जुलैपासून शाळा सुरू झाली होती. तरीसुद्धा आमची शाळा बांधली गेली नव्हती. त्यानंतर आम्ही बेड्यावर राहूनच मुलांना शिकवायचं ठरवलं. या उद्देशाने की तिथे राहिल्याने आमचं रोजचं मुलांच्या पालकांसोबत बोलणं होईल आणि पालक आम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शाळा बांधून देतील. 

रोज बोलणं झाल्यामुळे त्यांचे प्रयत्नही सुरू होते. बाथा भैय्याचे खेडी वरून ताडपत्री आणणे, ताडपत्री फाटली असल्यामुळे स्वतःच्या घरची ताडपत्री देतो म्हणणे. उद्यापासून झोपडी बनवायला सुरू करू असे बोलणे झाले. पण गुरुवारला सकाळीच सोनू दोषमा यांचा मृत्यू झाला त्यामुळे सगळी पुरुष मंडळी ही खेडीला अंतिम संस्काराला गेली. तर तिथल्या काही दीदी म्हणाल्या की, “वो लोग नही आयेंगे तो भी चलेगा, हम स्कूल बनाने में मदत करेंगे।” तर आम्ही शाळा बनवायला सुरुवात केली. आम्ही विचार केला की आम्ही शाळा बांधायला सुरुवात करू नंतर या सर्व दीदी आम्हाला मदत करतील. पण असं काहीही झालं नाही. आमची शाळेची मुलेच आम्हाला मदत करायला आली. त्यामध्ये राम, विशाल, कालू, विजय ही मुले होती. 

मुलांच्या मदतीने आमची संपूर्ण शाळा बांधली गेली. दुसऱ्या दिवशी पासूनच शाळेत आमचे छान क्लासेस घेणे सुरू झाले. असे दोन-तीन दिवस झाले. आणि त्याच दिवसांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आणि  त्यामुळे पावसाचे पाणी ताडपत्री वर जमा होत होते. त्यामुळे ताडपत्री काही ठिकाणांवरून फाटत चालली होती. दुसऱ्या दिवशी शाळेत ताडपत्री वर पावसाचे पाणी जमा होते. आणि मुले काठीने ताडपत्री वरील पाणी खाली पाडत होते. मुलांमध्ये स्वतःची शाळा वाचवण्याचा प्रयत्न सतत दिसत होता. सतत पाऊस सुरू असल्यामुळे एक दिवस आमच्या शाळेचे नुकसान झाले. तिथे बसण्यासाठी  कुठेच जागा नव्हती. सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. एकही जागा  बसण्यायोग्य नव्हती. हे सगळं पाहून मन खूप अस्वस्थ होत होते. तेव्हाच बेड्याचे मुखिया सिद्धू भैयांना कॉल करून विचारलं की झोपडीचे नुकसान झाले आहे तर कुठे शिकवायचं? तुम्ही शाळा कधी बांधून देणार? मला त्यांच्यासोबत बोलायला भीती वाटत होती. कसं फोन करायचं काही सुचत नव्हतं. हिम्मत करून फोन केला आणि विचारलं तर मग ते दुसऱ्या दिवशी झोपडी बघण्यासाठी आले. किती ताडपत्री लागेल, कुठे बांधायचं आहे, असा अंदाज घेतला आणि त्यांचे प्रयत्नही सुरू होते. पण त्याच काळामध्ये आजूबाजूच्या बेड्यावरील त्यांचे नातेवाईक मरण पावण्याच्या अजून २-३ घटना घडल्या. त्यामुळे सतत त्यांचं बाहेर जाणं येणं सुरू होतं. त्यामुळे पुन्हा शाळा बांधायला उशिर होत होता. 

मुलांना आजूबाजूला बसायला काहीच कोरडी जागा नव्हती. पालकांकडून आम्ही सतत मदत मागत होतो. त्यांना सांगत होतो की, मुलांना बसण्यासाठी कुठेच कोरडी जागा दिसत नाही. मग बसायचं कुठे? आणि समूहातील लोक शाळा बांधण्याची गोष्ट फार गांभीर्याने घेत नाहीत असं दिसत होतं. तेव्हा मी एक निर्णय घेतला की आम्ही काही दिवस शिकवायलाच नाही येणार. कारण तुम्हाला नाही वाटत की आमची मुलं शिकायला पाहिजे.  याविषयी त्यांच्यासोबत समोरासमोर आणि फोनवर पण बोलणं झालं. मग ते म्हणाले, “ऐसे मत करो मॅडम, हम दो दिन मे आपको  झोपडी बनाके देते हैं। तो दो दिन आप हमारे घर मे पढा लीजिए।” मग आम्ही मुलांच्या घरीच जाऊन शिकवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्या घरीच मुलांना शिकवत होतो. अशा प्रकारे शिकवणं सुरू असतांना घरच्या महिला बघायच्या की आम्ही कसे शिकवत आहोत मग त्यांनी आपल्या घरच्या व्यक्तींना सांगितलं की, यांना झोपडी बनवून द्या यांना शिकवण्यासाठी खूप प्रॉब्लेम जात आहे. तर पालक ते बघण्यासाठी आले. आणि बोलले की, झोपडी बांधायला उद्यापासून सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी झोपडी बांधण्याकरिता सुरुवात झाली. कोणी जंगलातून लाकूड आणत होते. तर कोणी दोऱ्या बांधत होते.कोणी ताडपत्री टाकण्यास मदत करत होते.अशा प्रकारे  सर्वजण वेगवेगळी कामे स्वतःच हातात घेत होते. आणि आता आमची मजबूत अशी शाळा तयार झाली आहे. 

Read more

असोला – लायब्ररी ची गोष्ट

– कांचन देवळे

मुलांना वाचनाची आवड असेल तर मुलांसाठी ज्ञानाची दारे खुली होतात, पुस्तकातील मजेदार दुनियेची ओळख होते. मुलांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी,  त्यात त्यांना आनंद वाटावा यासाठी वाचनासाठी  वेगवेगळे  पाठ नियोजन करणे, नवनवीन गोष्टींची पुस्तके शोधणे, ऍक्टिव्हिटी नियोजन करणे, मुलांना स्वतः काही गोष्टी वाचून दाखवणे इत्यादी प्रयोग चालू केले.

वर्गाच्या एका कोपऱ्यात मुलांच्या मदतीने एक लायब्ररी तयार केली. जिथे मोठया गटातील मुलांनी सहभागी होऊन छान लायब्ररी तयार करण्यास आवड दाखवली. पूर्ण लेव्हल ची पुस्तकं वेगवेगळी ठेवली. मोठ्या मुलांनी लहान मुलांना व्यवस्थित पुस्तक काढून देणे आणि ठेवायला लावणे, मुलांना आवडणारी पुस्तकं  मुलं स्वतः घेऊन जाणे आणि वाचणे असा दिनक्रम सुरु झाला. प्रत्येक विद्यार्थी रोज घरी एक पुस्तक घेऊन जातो. आणि त्या पुस्तकांमध्ये काय वाचलं हे दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये सांगत असतो. कोण पुस्तक घेऊन जात आहे याची नोंद घेण्याचे काम वर्गातल्या २ मुली करतात. 

एकदा २ऱ्या वर्गातली मुलगी लाभू हिला ‘प्ल्युटो’ हे पुस्तक वाचायला दिले आणि म्हटले की, हे पुस्तक वाच. तेव्हा ती म्हणाली, “मै नहीं पडती मॅडम, इसमे बहोत सारा लिखा है। इतना सारा नहीं पडती मैं।”  तेव्हा लाभू आणि अजुन १-२ मुलं माझ्या भोवती बसली आणि त्यांना मी त्यामधील एक गोष्ट वाचून दाखवली. त्यांना ती गोष्ट खूप आवडली. त्यांनी माझ्या कडून ते पुस्तक घेतले आणि बघायला लागले आणि “मॅडम और स्टोरी बताओ” असं  म्हणायला लागले.

मुलांसाठी मुक्तवाचनाचा वेळ ठेवला. जिथे आम्ही आणि आमची मुले आपली आवडीची पुस्तके आपल्या आवडत्या जागेवर जाऊन वाचणार. मुले आपल्या आवडीनुसार पुस्तक घेतात,आणि वाचतात. ज्या मुलांना वाचता येत नाही अशी मुले चित्र बघून पुस्तकाचा आनंद घेतात, किंवा मोठया मुलांच्या मदतीने ते वाचण्याचा प्रयत्न करतात. आणि मोठी मुले एकत्र बसून पुस्तकाविषयी गप्पा करतात.

अश्या प्रकारे मुलांना पुस्तकांची आवड निर्माण झाली, आणि पुस्तक बघतांना ते त्यात आपला आनंद शोधतात.

Read more

ठणठन – बेड्यावरचा स्वातंत्र्य दिवस

 – सुप्रिया नागोसे

15 ऑगस्ट 2024, बेड्यावरील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला. आम्ही भरवाड समुदायामध्ये सहभागी होऊन हा दुसरा उत्सव साजरा केला. यासाठी खूप तयारी करायच्या होत्या. तर आम्ही दोन दिवस बेड्यावर थांबण्याचा विचार केला होता. या मागचं कारण असं की त्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व समजावून देणे. त्यासाठी आम्ही मंगळवारी बेड्यावरच थांबलो.

रात्री आम्ही मुलांचे स्वतंत्र दिनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणार होतो. त्यासाठी डान्सची प्रॅक्टिस घेतली, मुले खूप उत्साही दिसत होते. जास्तीत जास्त मुलांनी या कार्यक्रमासाठी तयारी केली होती. बुधवारला आम्ही या कार्यक्रमासाठी काय काय कामे करावी लागतील, कोणती कामे झालेली आहे, कोणती कामे करायची बाकी आहे, याबाबत बोलत होतो. यात आम्हाला झेंडा फडकवण्यासाठी बांबूची सोय करावी लागणार होती. शाळेभोवतीचा कचरा साफ करणे, रांगोळी काढणे, कार्यक्रमाबाबत मुलांना व पालकांना यायला सांगणे इत्यादी कामे मला दिसत होती. 

सायंकाळी आम्ही बेड्यावरील मुखिया व बेड्यावरील इतरही सर्व लोकांना आमंत्रित करण्यासाठी गेलो. सुरूवातीला आम्ही सिद्धु भैय्याकडे गेलो. त्यांच्याकडे आणखी काही पुरुष मंडळी जमलेली होती. आम्ही दिसताच सिद्धू भैया म्हणाले की, ‘हो गयी कल की तैयारी?’ तर मग आम्ही त्यांना झालेली कामे आणि बाकी असलेली कामे सांगितली. तर ते म्हणाले की, बांबूची सोय मी करून देतो. आणि बाकी मंडळी म्हणाली की, शाळेभोवतीचा कचरा काढायला आम्ही मदत करू. हे ऐकून मनाला खूप धीर येत होता. 

15 ऑगस्टच्या सकाळी आम्ही सहाला शाळेमध्ये पोहोचलो. तेव्हा प्रशांत भैय्या, सिद्धू भैय्या  आणि काही बेड्यावरील मोठी मुले तिथे आधीच आलेली होती. सिद्धु भैय्या बांबू जमिनीत गाडत होते, प्रशांत भैय्या व बाकी लोक शाळेभोवतीचा कचरा काढत होते. शाळेविषयीची प्रेमभावना आणि त्यांचे समर्थन त्यांच्या या कामातून ठळक उठून दिसत होती. नंतर आम्ही रांगोळी काढली आणि बेड्यावरील महिलांना आणि बाकी लोकांना बोलावून आणले, सिद्धू भैयांनी झेंडा फडकवला. सगळ्यांनी मिळुन राष्ट्रगीत म्हटले. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. बेड्यावर प्रभातफेरी काढण्यात आली, मुलांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम,लाठी काठी हे उपक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडले. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सर्वजण सहभागी झाले होते. आणि हा आमचा बेड्यावरील स्वतंत्र्य दिनाचा अनुभव खूप छान आणि अविस्मरणीय होता. 

Read more

बोथली – महिलांसाठी आनंदाचे क्षण

– प्रतीक्षा पखाले

बेड्यावरील महिला दिवसभर कामात गुंतलेल्या असतात. त्यांचा दिनक्रम पाहिला तर विचार येतो की या स्वतःसाठी जगायच्या विसरल्याच आहे. त्यांचा संपूर्ण दिवस हा घर कामात आणि मुलातच जातो. स्वतःला वेळ द्यायला, स्वतःला काय आवडते, काय शिकायला आवडते याचा विचार देखील ते करत नाहीत. 

एके दिवशी माझी सोबती फेलो जनक आणि मी चर्चा करत होतो. त्यामध्ये बोलता बोलता जनक म्हणाली, “बहुत दिन हो गये कोई मूवी नही देखी।” आणि मी म्हटले, “क्यू ना हम साथ मिलकर मूवी देखे?” या संवादातून एक कल्पना आली की, बेड्यावरील सर्व महिला या कामातच असतात, संपूर्ण वेळ त्या कामातच घालवतात तर आपण सर्व महिलांना मूवी दाखवायला पाहीजे. आणि बेड्यावरील महिलांसोबत बसून एक दिवस ठरवायला पाहिजे. 

दुसऱ्या दिवशी सायंकाळी सर्वांच्या घरी जाऊन सांगितले  “दीदी आज रात हम मूवी देखने वाले हैं। तो आप जितनी जल्दी हो सके अपने काम कर लेना।” खूप वेळ झाला होता,तरी कोणीच येताना दिसत नव्हते. मला वाटत होते की, वेळ खूप झालेला आहे तर आता कोणीही येणार नाही. मी पुन्हा त्यांच्या घरी त्यांना बोलवायला गेली. आणि थोड्याच वेळात झोपडीत महिलांनी गर्दी केली. मी मूव्ही सुरू केली. त्यांचा थकवा नाहीसा झाल्यासारखं वाटत होते. त्या एकमेकांना सांगत होत्या, ‘बहुत दिन हो  गये मूवी नही देखी थी, बहुत अच्छा लग रहा है।” त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आनंद सहज झळकत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद पाहून महिलांसोबत अजून कोण-कोणते उपक्रम राबवू शकतो याच्या कल्पना येत होत्या.

Read more

चक्रीघाट – समुदायातील मोठ्यांशी, पुरुषांशी संवाद कसा तयार करायचा?

– कोमल गौतम

बुधवारचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी निधी ताईला नागपूरला मीटिंगसाठी जायचं होते.झोपडीमध्ये गारही (माती आणि शेणाने सारवणे) तयार करायचा होता. आणि बेड्यावर राखीचा कार्यक्रमही आम्ही ठरवलेला होता. यामध्ये राखीचा कार्यक्रम कसा घ्यायचा? समुदायाला कोणते प्रश्न पडतील? वेळ कोणती ठेवायची? ते वेळ देतील का? दोन्ही बेड्यावरील लोक एकमेकांशी बोलत नसल्यामुळे ते एका झोपडीत सोबत येतील का? या सर्व प्रश्नांनी मी गोंधळलेली होती. 

 

जंगलात जाऊन माती आणणे, झोपडीत गार करणे आणि त्याच दिवशी राखीचा कार्यक्रमही घेणे हे थोडं अवघड वाटत होतं. पण पल्लवी ताई आणि निधी ताईच्या मदतीने आम्ही दिवसाचे छान पद्धतीने नियोजन केले. आणि हे व्यवस्थित होण्याकरिता आमचे प्रयत्नही सुरू होते. 

सकाळच्या वेळी झोपडीत गार केला आणि बाहेर झाडाखाली क्लास घेतला. आणि सायंकाळी आम्ही बेड्यावरील प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना बोलावून आणायचं ठरवलं. पण हा त्यांचा दोहारीचा (दूध काढण्याचा) वेळ होता. आणि  या दरम्यान पाऊसही सुरू झाला होता. पावसामुळे त्यांची दोहारी थांबली,आणि अजून तेवढाच आमचा वेळ गेला. 

तोपर्यंत आम्ही राखीची तयारी करून ठेवली. त्या वेळेच्या सुमारास आम्ही त्यांची वेशभूषा केली. आमच्या झोपडीत लाईट नव्हता, तर लाला काकांनी त्यांच्या घरचा लाईट काढून आमच्या झोपडीत लावायला दिला. काही वेळात दोन्ही बेड्यावरील भैय्या झोपडीत उपस्थित झाले. आम्ही राखीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आम्ही प्रत्येकाला एक नारळ आणि एक रुमाल दिले. त्यांच्या हाताला राखी बांधली. तिथले देवकरण भैय्या म्हणाले, “आज से आप हमारी बहने हुई।” हे वाक्य आमच्यासाठी खूप आनंदाचे होते आणि दोन्ही बेड्यावरील लोकांना एकत्र पाहून खूप समाधानकारक वाटत होते. 

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *