चार दिवसांसाठी मला आणि निशेलला कार्यशाळेसाठी नागपूर जायचे होते. परंतु या चार दिवसांत मुलांना कोण शिकविणार हा प्रश्न दोघांनाही पडला होता. या विषयावर मुलांसोबत आम्ही बोललो तेव्हा मेहुल (१३ वर्ष ) म्हणाला, “भैय्या हम चार दिन तुम्हारे जैसा एक-दूसरे को पढ़ाएंगे।”. मेहूलने दिलेल्या या कल्पनेच्या आधारे मुलांनी चार दिवसाच्या जबाबदारीचे संपूर्ण नियोजन तयार केले. पण तरीही आम्हा दोघांच्या मनात प्रश्नच होते कि खरंच चार दिवसासाठी शिकवण्यापासून ते शाळा संभाळण्यापर्यंतची जबाबदारी मुलांना देणे योग्य होईल का? शाळेतील सामानाचे मुले नुकसान तर नाही करणार? असे एक ना अनेक प्रश्न मनात पडत होते. यासंबंधी आम्ही पालकांशी बोललो तेव्हा पहिलीतील अजयची आई (रतन दीदी) म्हणाली, “ सर, चाबी मुझे दो, मैं स्कूल का ध्यान रखूंगी।” रतन दीदी सोबत बेड्यावरच्या बाकी पालकांनी देखील चार दिवस शाळा आणि मुले सांभाळण्याची जबाबदारी स्विकारली. पालकांच्या आणि मुलांच्या सहकार्याने आम्ही दोघेही नागपूरला training साठी आलो.
आमच्या चार दिवसाच्या अनुपस्थितीमध्ये मुलांनी एकमेकांना शिकविण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. मुलांनी शिकविण्यासाठी स्वतःच्या आवडीचे विषय घेतले. त्यात मेहुलने तर इंग्रजी विषय शिकविण्याचे ठरविले, चौथ्या वर्गातील पूजा मराठी शिकवणार होती. गौरीने चार दिवस Story-Telling करायचे ठरविले. चौथ्या वर्गातील राधु परिसर अभ्यास शिकविणार होती. अशा प्रकारे प्रत्येक मुलाने एक-एक विषय शिकविण्याचे ठरविले. या चारही दिवसात मुलांनी शाळेच्या time table प्रमाणे वर्गांमध्ये एकमेकांना शिकविले. एकमेकांना शिकविताना Experiential Learning मुलांनी सोबत केली. गौरीने परिसर अभ्यास शिकविताना परिसर स्वच्छतेपासून ते बागकाम करण्याचा अनुभव सगळ्या मुलांना दिला. मुलांचे पालकही वेळात वेळ काढून मुले काय करत आहे, हे पाहण्यासाठी स्वतःची कामे बाजूला ठेऊन शाळेत जायचे. शाळा चालविण्याची हि प्रक्रिया सतत चार दिवस चालू राहिली. आमच्या दोघांचे training आता संपले होते आणि आम्ही बेड्यावर परत गेलो. या चार दिवसांत मुलांनी काय-काय केले याबद्दल जेव्हा प्रत्येक मूल त्यांचा आनंद सांगत होते, तेव्हा त्यांचे reflections ऐकून मला आणि निलेशला खूप मस्त वाटत होतं. मुलांना आणि पालकांना या चार दिवसात खूप मज्जा आली होती. मुलांचा आणि पालकांचा उत्साह आणखी वाढला होता. या चार दिवसात पालक आणि मुलांनी मिळून आमच्या बेड्यावर शिक्षणात स्वयंशासन राबविले होते. स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी मुलांनी पालकांसोबत घेतली आणि शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये आपली Learnings चालू ठेवली.
कुणाल माहूरकर & निलेश डोके