संकलन आणि संपादन – निकिता देवासे
बोथली – सामूहिक योगदानातून शाळेच्या झोपडीचे बांधकाम
प्रतीक्षा पखाले
आजचा दिवस माझ्यासाठी खुप अविस्मरणीय ठरला. आज गावातील शाळेला सुट्टी असल्यामुळे जनक आणि मी आज बेड्यावर होतो. रोज मी मुलांना घेऊन गावातील शाळेत शिकवायचे तर वर्ग कुठे घ्यायचे हा प्रश्न निर्माण होत नव्हता.
पण आज शाळेला सुट्टी असल्यामुळे ‘मुलांना कुठे शिकवायचे’ हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हाच आम्ही जनकच्या घरी गेलो तिथे बसून असलेल्या शिवा भैय्या, जयसिंग भैय्या आणि दादाजी यांना पडलेल्या प्रश्नांबद्दल विचारले, तेव्हा ते विचारात पडले, आणि अजून एक प्रश्न कुणाल दादानी त्यांना केला, “दादाजी, अब तक झोपडी क्यूँ नहीं बनी?” या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. ते तिघेजण थोड्या वेळासाठी झोपडीच्या बाहेर निघाले. ते या विषयावर विचार विनिमय करताना दिसत होते. थोड्याच वेळात दादाजी, शिवा भैयाला म्हणाले की, “जाकर टीचर को पूछो की कोनसी जगा पे झोपडी बनानी है।” हे वाक्य आम्ही झोपडीत असताना ऐकले. हे वाक्य बोलताच मनामध्ये जे झोपडी कधी होईल याविषयी जे विचार सुरू होते त्या विचारांतुन सुटका झाल्यासारखं वाटलं. शिवा भैय्या आणि आम्ही सगळे मिळून झोपडीची जागा बघितली. तीन जागा बघितल्यानंतर शेवटी प्री-प्रायमरीच्या आणि प्रायमरीच्या मुलांना सोयीस्कर होईल अशा जागेवर झोपडी बनवण्याचा निर्णय घेतला. जागा ठरताच आम्ही फक्त खड्डे करायला सुरवात केली आणि त्यानंतर शिवा भैय्या मुलांना घेऊन एक एक वस्तू आणू लागले. झोपडीसाठी लागणारी ताडपत्री नव्हती आणि त्यांचं म्हणणं होतं की,”एकही बार स्कूल बनायेंगे लेकिन अच्छी बनायेंगे।” पण एवढ्या महागाची ताडपत्री घरून कोण देणार? तर त्यासाठी काय करता येईल म्हणून आम्ही डोनेशन काढण्याचा निर्णय घेतला. “आज ही पैसे जमा किये तो अच्छा होगा।”असं म्हणून शिवा भैय्याने ताडपत्री वाल्यांना कॉल करून ठेवला. त्यानंतर लगेच पेरेंट्स मिटिंग भरवली आणि शाळेला येणारा प्रश्न आणि खर्च याबद्दल चर्चा केली. यावर सुरुवातीला पालकांची मते घेतली आणि पालकांचा होकार ऐकून मीटिंग संपल्यानंतर आम्ही मुलांना घेऊन प्रत्येक घरी गेलो आणि घरी मुलांच्या संख्येनुसार पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. आमची त्वरित कृती, मुलांची देणगी मागण्याची उत्सुकता आणि त्याला मिळणारा पालकांचा प्रतिसाद यामधून शाळेसाठी लागणाऱ्या देणगीच खूप सुंदर चित्र निर्माण झाले. काही रक्कमची कमी पडत होती तर जनकच्या घरामधूनही मदतीचा हात आम्हाला मिळाला. या सगळ्या प्रयत्नातून शाळेसाठी 5000 रुपयाची रक्क्म जमा झाली. जमा झालेल्या रक्कमेतून ताडपत्री आली. अशा रीतीने मुलांच्या आणि पालकांच्या सहकार्याने आमची सुंदर अशी शाळा तयार झाली.
चक्रीघाट – आमचे स्टुडंट लीडर
कोमल गौतम
आज झोपडीत प्रवेश करताच मुलांचं नवीन चित्रच पहायला मिळालं. काही दिवसासापूर्वी जी मुले सतत छोट्या छोट्या भावंडांना घेऊन मस्ती करतांना दिसायची ती मुले आज समजूतदारपणे लहान मुलांना शिकवतांना दिसली. मुलांची ही लीडरशिप पाहून मी आश्चर्यचकित झाले.
आम्ही काही दिवसापूर्वी ‘Student leaders’ प्रोजेक्ट सुरू केला. म्हणजे मुलांनीच काही त्यांच्यापेक्षा लहान मुलांना शिकवायची किंवा इतर कामांची जबाबदारी घ्यायची. सुरुवातीला हा प्रोजेक्ट खूप कठीण आणि त्रासदायक जात होता. मुलं स्वभावतःच खूप चंचल, छोट्या छोट्या गोष्टी वरुन भांडण करणारी. त्यात स्वतः लीडरशिप घेऊन मुलांना शिकवण जरा अवघड जात होते. तर आम्ही असे ठरवले की, रियाजघर मध्ये जी मुले आलेली होती त्यांना लिडरशिपचा थोडाफार अनुभव आलेला होता. त्या मुलांना ही लिडरशिप दिली व आपल्याच भावाबहिणीला आपल्याला शिकवायचे आहे असे सांगितले. या सोबत आम्ही मुलांसोबत मीटिंग घेतली आणि त्यांना काय करायचे आहे याची त्यांना कल्पना दिली. हा प्रोजेक्ट आपण का घेत आहोत आणि हे केल्याने काय होईल. हे सगळं आम्ही या मुलांना सांगितलं. या मुलांना आम्ही एक डायरी आणि पेन दिला आणि त्यांना स्वतः आपण मुलांना कश्याप्रकारे शिकवू शकतो, कोणत्या अॅक्टिविटीद्वारे शिकू शकतो, ही कल्पना करायला लावली आणि ते लिहायला लावले.
दुसऱ्याच दिवशी मुलांनी छान अॅक्टिविटी शोधायला सुरुवात केली व ते डायरी मध्ये लिहणे सुरू केले. प्रत्येक जण एक-दोन मुलांना घेऊन बसले. भांडण न करता स्वतःच मुले विभागली. आणि आम्हाला वाटत होते की पहिला दिवस आहे
तर १५-२० मिनिट तरी मुलांचा वर्ग चालायला हवा. मुलांनी वर्ग घ्यायला सुरुवात केली. आम्ही बाजूला उभे होऊन वर्गाचे निरीक्षण करत होतो. वाली तिच्या लहान भावाला बाराखडी शिकवत होती तिने खूप छान अॅक्टिविटी प्लॅंन केल्या होत्या. कल्लू तिच्या बहिणीची उजळणी घेत होती. जयेश दोन मुलांची वर्णांची ओळख घेत होता. सवा ला पूर्व प्राथमिक मुलांना शिकवायचे होते आणि पूर्व प्राथमिकची त्याला काही कल्पना नाही असे दिसत होते. पण त्याने छान मुलांना त्यांच्या आवडीची चित्रे काढायला लावली. काही मुले चित्रवाचन करत होती. सर्वच मुले वर्गात रमलेली दिसत होती. हे सगळं पाहून आपण मुलांसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येतांना दिसत होते. हे सगळं पाहून मनाला खूप समाधानकारक वाटत होतं.
सोनखांब – गांधी जयंती
प्रीतम नेहारे
आज २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. मुलांनी आणि मी मिळून जयंती साजरी करायची ठरवली. सर्व मुले खूप उत्साहात दिसत होती. लहान-मोठी मुले मिळून कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीची नोंद घेत होते.
जयंतीची तयारी करत होती. व्यवस्थित खुर्च्या लावणे, खाली सतरंजी टाकणे यात लहान मुलेही सहभागी होती. मुलांना दोन दिवसा आधीच या कार्यक्रमाबद्दल सांगण्यात आले होते. मुलांनी छान अशी छोटी छोटी भाषणे तयार केली होती.
कार्यक्रमाला सुरुवात झाली. बेड्यावरील काही पुरुष मंडळीही जमलेली होती. एका मूलाच्या पालकाच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन झाले. छान फुलांचा हार प्रतिमेला वाहण्यात आला. मुलांच्या भाषणाची वेळ झाली.मुलांनी छान भाषणाला सुरुवात केली. मोठी मुले भाषण देत असतांना पाहुन लहान मुलांची भाषण देण्याची इच्छा निर्माण झाली असे दिसत होते. मी सुरेशला म्हणालो, “आओ सुरेश तुम भी बोलो कुछ गांधीजी के बारे में।” तर तो सर्वांसमोर यायला, बोलायला भीत होता. नंतर मी विक्रमला आवाज दिला आणि तो बोलायला लागला.
“आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन करूया व कार्यक्रमाला विराम देऊया,” असे म्हणताच सुरेश उठला आणि म्हणाला, “सर मुझे भी कुछ बोलना है।” मला खूप छान वाटले. त्यांनी चार-पाच वाक्यात खूप छान माहिती सांगितली. अशा प्रकारे त्याचा कॉन्फिडन्स वाढताना आता दिसत आहे.
ठणठण – अनोखी पालकसभा
पल्लवी शंभरकर
गेल्या तीन महिन्यांमध्ये मुलांना वाचता यावे, त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हे आमचे तीन महिन्याचे ध्येय होते. ते पूर्ण करण्यासाठी आमचे सतत प्रयत्नही सुरु होते. मुलं शिकत आहेत का? हे जाणून घेण्यासाठी आम्हाला पालक सभा घ्यायची होती.
पण मागील दोन महिन्यांमध्ये पालकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पालक तर यायचे पण त्यांना दिवसभर काम असल्याने ते खूप उशिरा, 4 वाजता यायचे. नंतर त्यांना लगेच घरी जाण्याची घाई दिसून यायची. आपल्या मुलांची शिक्षणाबाबत किती प्रगती झाली आहे हे बघायची उत्सुकता असायची, पण घरी कोणी नसल्यामुळे त्यांना घरी जावं लागत होतं . पालकांना मुलांमध्ये काही बदल दिसते का? पालकांसोबत मुलांच्या वाचनासंबंधी सविस्तर चर्चा करायची होती.
तीन महिन्याचे Quarter goal पण संपलेल होत आणि पालकांना मुलांची किती प्रगती झाली ते दाखवायचे होते. पालकांच्या दृष्टिकोनातून मुलांची अजून काय प्रगती व्हायला पाहिजे याविषयी त्यांची मते जाणून घ्यायची होती.
तिघी मिळून आम्ही हा निर्णय घेतला की यावेळेस पालकसभा थोडी वेगळ्या पद्धतीने घ्यायची. आम्ही समुदायमध्ये गेलो आणि पालकांचे त्यांचा अनुभव जाणून घेतले.
सर्वप्रथम आम्ही करमन भैय्या च्या घरी गेलो. किंजल विषयी त्यांच्याशी बोलणे केले. आम्ही किंजल ला वाचायला लावले आणि नंतर रेखा दिदीला विचारले, “ये तीन महिने में कींजल के पढने-लिखने मे क्या बदलाव हुआ है?” रेखा दीदी बोलल्या,“ मेरी किंजल बहुत पढ़ाई करती है। भाई बहन को पढ़ाती है। किंजल के डोहा पापा बोले की, हम किंजल की पढ़ाई बंद नही करेंगे आगे भी पढ़ाएंगे।” हे ऐकून आम्हाला फार आनंद झाला.
नंतर आम्ही करसन भैय्या कडे गेलो. करसन भैय्या का कहना था की ,
“बच्चो के ऊपर मां बाप का भी ध्यान देना जरूरी है। राहुल को अभी अच्छे से पढ़ना आ रहा है। कान्हा और कालू को पढ़ाने के लिए बोलते हैं।”
बाथा भैय्या ऐसे बोल रहे थे की “विशाल और वसंत को अच्छे से पढ़ना आ रहा है। बच्चे स्कूल आने चाहिए ये मां बाप की जिम्मेदारी है।” अशी बरीच वेगवेगळी सर्व पालकांचे अनुभव मनाला खूप भावले.अशा रीतीने आमची पालकसभा खूप छान प्रकारे पार पडली आणि सोबतच क्वार्टर गोल सेलिब्रेशन पण झाले.
असोला – वीट कारखान्याला भेट
कांचन देवळे
आज शाळेला सुट्टी असल्याने आम्ही मुलांना बाहेर घेऊन जाण्याचे नियोजन केले.आम्हाला गावापासून जवळ पडत असेल अशी जागा आम्ही शोधत होते. तेव्हा बेडयापासून काही दूर विटांचा कारखाना आहे, जिथे आम्ही मुलांना घेऊन जायचे ठरवले.
त्यासाठी प्रत्येक पालकांकडून मुलांना बाहेर घेऊन जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी यावर लगेच होकारही दिला. आणि आम्ही मुलांना कारखान्याकडे घेऊन निघालो.
कारखाना हा अगदी रस्त्यावर होता. मुलांनी कारखान्यात जाण्यासाठी आम्हाला जंगलाच्या रस्त्याने जाऊ असे सांगितले. मुलं पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो आणि मुलांच्या म्हणण्याप्रमाणे लगेच आम्ही पायी चालून तिथे पोहोचलो.
आम्ही मुलांना कारखान्याचे, तेथील परिसराचे निरीक्षण करायला लावले. मुलं छान मस्ती करताना दिसत होती. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. तिथल्या दादांनी आम्हाला संपूर्ण कारखाना दाखवला. वीट कशी बनवल्या जाते ते सांगितले. निर्यात कुठे कुठे होते, एक विटेचा भाव किती व कसा ठरवला जातो ते सांगितले. आणि मुलं खूप मन लावून हे ऐकत होती. परिसरात मुलांना वीट एक जागेवरून दुसऱ्या जागी न्यायची गाडी दिसली. मुलांची गाडी चालवण्याची उत्सुकता बघून तेथील कामगार आणि मालकानी मुलांना विटा घेऊन जाण्यास परवानगी दिली. खूप वेळ ते काम करत राहले. त्यात सिधराज म्हणाला, “हम इधर ही 5 बजे तक रुक जाते हैं, बहुत मजा आ रहा हैl” अशा प्रकारे आजचा संपूर्ण दिवस खूप मजेत गेला.