आज नेहमीप्रमाणे आम्ही सकाळची प्रार्थना केली आणि मग गप्पांच्या सत्राला सुरुवात केली. पण पाहतो काय, आज वर्गात कोणाचंच लक्ष नाही. आणि असणार कसं? सोनखांब ला वस्ती तयार झाल्यापासून जवळपास चाळीस वर्षांनी आणि आमच्या सर्वांच्या मागील वर्षभराच्या प्रयत्नानंतर अखेर सोनखांब मध्ये वीज येणार होती. कितीतरी प्रतीक्षा आणि प्रयत्नानंतर शेवटी एकदाचे विद्युत जोडणीसाठी खांब येऊन पडले होते आणि कामाची लगबग सुरु होती.
मग काय? वर्ग थांबवला आणि आम्हीपण पोहोचलो कामाच्या ठिकाणी. मी मुलांना विचारलं, “अच्छा बताओ, लाइट आने पर क्या होगा?”
मेहुल म्हणाला, “हमको चारे के लिए घूमना नहीं पड़ेगा, हम अगले साल यही पर चारा उगायेंगे और फिर स्कुल छोड़कर जाना नहीं पड़ेगा।”
गौरी आणि किशोर म्हणाले, “भैया हम रात को भी पढाई कर पाएंगे।”
वर्षभरापूर्वी जागेची पाहणी आणि विजेच्या खांबांसाठी जागेचे मोजमाप झाले होते. गावचे सरपंच आणि वीज मंडळाच्या JE मोरे मॅडम आणि त्यांचे कार्यकर्ते बेड्यावर जागेची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस गावचे सरपंच आणि बेड्यावरच्या सदस्यांचे म्हणणे असे होते की बेड्यावर विद्युतीकरण येण्यासाठी जेवढा खर्च लागतो त्यातील अर्धा खर्च गावाची ग्रामपंचायत करेल आणि अर्धा खर्च आपल्याला करावा लागेल. मात्र रामजी जोगरणा आणि गणेश बिराजदार यांनी समुदायातील नागरिकांना समजावून सांगितले की हे काम खरेतर वीज मंडळाचे आहे, यासाठी आपल्याला खर्च करावा लागला नाही पाहिजे. आपण काही दिवस थांबून वाट बघू. जर हा पूर्ण खर्च MECB च्या खात्यातून झाला नाही तर आपण अर्धा खर्च करू. त्याबद्दल काही दिवसानंतर MECB सोबत बोलणे झाले. पण MECB मधील अधिकारी त्या बाबतीत माहिती काहीही माहिती देत नव्हते. ऋषभ आणि मी दर आठवड्याला मुलांना भेटायला जायचो तेव्हा आम्ही MECB ला पण भेट देत होतो. बेड्यातील राहुल, विजय हे तरुण तसेच रामजी देखील सातत्याने पाठपुरावा करत होते. कोरोना चे निमित्त करून गोष्टी पुढे ढकलल्या जात होत्या. विजेच्या बाबतीत जवळपासचे गावकरी सुद्धा सतत म्हणायचे की यांची शेतीचा NA झालेला नाही आणि त्यामुळे वीज येणे कठीण आहे. बेड्यावरचा विजय जोगराना शाळा बांधणी पासुन तर इतर कोणत्याही कामात मदत करायचा. तो माझ्या जवळ नेहमी त्याचे स्वप्न व्यक्त करायचा की आपल्या बेड्यावर विद्युतीकरण झाले की माझा स्वतःचा उद्योग सुरू करणार आणि जे बेड्यावरचं दूध बाहेरील व्यक्ती घेऊन जातो तेच दूध मी घेऊन जाणार. तसेच बाकी सदस्य सुद्धा म्हणायचे की विद्युतीकरण झाल्यावर आमचे खूप प्रश्न सुटणार. जसे गाई ला ढेप लागते ते आम्ही इथेच तयार करू, तर कोणी आमचं दूध पॉकेट मध्ये भरून विकू असे सांगत.
समुदायातील काही लोकांनी विद्युती करणाची अशास सोडली होती. आम्हाला यांनी विनाकारण अमिश दाखवले असे त्यांना वाटत होते. पण शेवटी दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बेड्यावर वीज आली तर बेड्यावर दिवाळीचे वातावरण तयार झाले. गावातल्या लोकांना पण माहिती झालं तर सगळीकडे त्याच गोष्टी वर चर्चा सुरू आहे. आम्हालाही वीज आलेली पाहून खूप आनंद झाला आहे आणि मागील उन्हाळ्यात सातत्याने MECB चकरा मारण्यासाठी केलेली मेहनत सार्थक झाल्याचे समाधान वाटत आहे.